Saturday 16 February 2013

शिवाजी महाराज 2

स्वामीनिष्ठ सेवक - खंडोबल्लाळ 

स्वामिनिष्ठ सेवकांमध्ये खंडोबल्लाळ याचा हात धरणारा दुसरा कोणी नसेल. खंडोबल्लाळ हा छत्रपतींचे चिटणीस बाळाजी यांचा मुलगा. आपल्या वडिलांना संभाजी महाराजांनी ठार मारल्याचे माहीत असूनही तो स्वामिनिष्ठेपायी त्यांच्याकडे चाकरीला राहिला. संभाजी महाराजांच्या पत्रव्यवहाराचे काम तो पाहत असे. एकदा संभाजी महाराजांनी त्याला काही महत्त्वाची पत्रे लिहायला सांगितली. ती पत्रे लिहून होईपर्यंत संभाजी महाराज घोडय़ावरून दुसरीकडे निघून गेले. खंडोबल्लाळ याच्या ते लक्षात आल्यानंतर त्या पत्रांवर संभाजी महाराजांची स्वाक्षरी घेण्यासाठी तो त्यांच्या मार्गावर पळत निघाला. संभाजी महाराज पुढे घोडय़ावर आणि खंडोबल्लाळ पायी पळत. असे असूनही त्याने अखेर संभाजी महाराजांना गाठले. पळण्याच्या अतिश्रमामुळे खंडोबल्लाळांना रक्ताची उलटी झाली. मात्र तशाही अवस्थेत त्यांनी ती पत्रे महाराजांना दाखविली. आपल्यामागे खंडोबल्लाळ पळत असल्याचे पाहून संभाजी महाराजांनाही गहिवरून आले..


संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज गादीवर बसले; परंतु त्यांच्या जिवालाही मोगलांकडून धोका होता. म्हणून ते वेषांतर करूनच प्रवास करीत असत. एकदा एका धर्मशाळेत यात्रेकरूंच्या वेशात राजाराम महाराज राहिले. बरोबर खंडोबल्लाळ व अन्य सहकारी होते. त्यांच्या हालचालीवरून एकाला संशय आला व त्याने त्याची खबर लगेच मोगली सैन्याला दिली. चाणाक्ष खंडोबल्लाळला हे कळताच त्याने राजाराम महाराजांना त्वरित दुसऱ्या मार्गाने पुढे पाठविले व स्वत: काही सहकाऱ्यांबरोबर धर्मशाळेत राहिला. मोगली सैन्य आले व त्यांनी खंडोबल्लाळसह त्याच्या सहकाऱ्यांना पकडले आणि राजाराम महाराजांचा ठावठिकाणा सांगावा म्हणून त्यांचे अतिशय हालहाल केले; परंतु खंडोबल्लाळांनी तोंडातून ब्रही काढला नाही. अतिशय छळ करून खंडोबल्लाळ काहीच सांगत नसल्याचे पाहून त्या मोगली सैनिकांचीही खात्री झाली की, याला राजाराम महाराजांविषयी काहीच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी त्याला सोडून दिले. खंडोबल्लाळ नंतर राजाराम महाराजांना जाऊन मिळाले. त्यांचे झालेले हाल पाहून राजाराम महाराजांनाही फार वाईट वाटले व त्यांनी खंडोबल्लाळच्या स्वामिनिष्ठेबद्दल प्रशंसोद्गार काढले. 

No comments:

Post a Comment