Friday 8 February 2013

धवलक्रांतीतील गरुड झेप संगमनेर तालुका दुध संघ

Sangamner Sahakari Dudh Sanghनैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील शेतकरी, भूमिहीन, अल्पभुधारक, मजूर आणि आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्व.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी १२ नोव्हेंबर १९७७ रोजी संगमनेर तालुका दुध संघ मर्यादित, संगमनेर या दुध संघाची सहकारी तत्वावर स्थापना केली. तत्कालीन चेअरमन बाळासाहेब गुंजाळ यांच्या कुशल नेतृत्वाखाली दुध संघाची यशस्वी वाटचाल सुरु झाली. सुरुवातीला दुध संघाचे संकलन १५०० लिटर्स होते ते आज २.८५ लाख लिटर्स पर्यंत जाऊन पोहोचले आहे. तालुक्यातील दुग्धव्यवसाय वाढीसाठी संकरीत गो पैदास, दुग्धव्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, परिसंवाद, संकरीत जनावरांचे मेळावे, दुग्धविकास प्रकल्पात महिलांना संधी त्याचबरोबर संस्थापातळीवर लाऊडस्पीकरद्वारे तज्ज्ञांची ध्वनीमुद्रित केलेली व्याख्याने ऐकविण्याचा उपक्रम त्याकाळी सुरु झाला. दुध संघांच्या प्रारंभीच्या काळात १९ सहकारी संस्थामार्फत दुध संकलन करून नाशिक, अहमदनगर येथील शासकीय दुध योजनेस भाडोत्री ट्रकद्वारे दुध पुरवठा केला जात असे. त्याकाळात अत्यल्प असलेले संकरीत गाईंचे प्रमाण वाढविण्यासाठी संगमनेर साखर कारखान्यातर्फे स्व.डॉ.मणीभाई देसाई व स्व.आण्णासाहेब शिंदे यांच्या अनोमोल सहकार्यातून भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान उरळी-कांचनतर्फे संकरीत गो-पैदास (कृत्रिम रेतन) केंद्र सुरु करण्यात आले. याच दरम्यान महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी राजकीय आणि सामाजिक जीवनाला सुरुवात केली. प्रतिष्ठेसाठी जगण्यापेक्षा आदर्शवत सुसंस्कारांच्या सावलीतून आपण गरीब शेतकरी वर्गाची सेवा करून ऋणमुक्त होऊ शकतो, ही भावना नामदार थोरातांनी जपली ती आजपर्यंत.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तळमळीने प्रयत्न करणाऱ्या नामदार थोरातांची १९८१ माध्य संगमनेर दुधसंघावर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. तर १९८८ मध्ये नामदार थोरात संगमनेर दुधसंघाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर सलग १९९३ पर्यंत त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. २००८ पर्यंत ते दुधसंघाचे संचालक राहिले. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली दुधसंघाने विविध विकास प्रकल्प यशस्वीरित्या राबवले. याचे फलित म्हणून राज्यात आणि राज्याबाहेरही दुधसंघाचे नावलौकिक पसरला. महाराष्ट्र तालुका दुध संघात संगमनेर दुध संघ अव्वल ठरला आणि त्यानंतर विकासाचा आलेख सातत्याने चढताच राहिला.
आजमितीला संघाचे दुध संकलन २.८५ लाख लिटर्स असून विक्री २ लाख ५० हजार लिटर्स इतकी आहे. दुधाबरोबरच दुधाचे उपपदार्थ तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, सुगंधी दुध, पेढा, लस्सी, दही, ताक, गुलाबजामून, खवा, बर्फी, रसगुल्ले, चीज त्याचबरोबर मँगो ड्रिंक्स आदींची निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर पसंती लाभली आहे. राज्यातच नव्हे तर गुजराथमधील सुरत व कर्नाटक राज्यात गुलबर्गा शहरापर्यंत विक्री होत आहे. राजहंस दुध व दुग्धजन्य पदार्थांबरोबरच राजहंस अॅक्वा पॅकेज्ड ड्रिंकिंग वाटरचा ३ कोटी ५० लक्ष रुपयांचा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. प्रतिदिनी २५ हजार लिटर पाण्याची विक्री सुरु असून उन्हाळ्यात ४० – ४५ हजार लिटर पर्यंत विक्री होते. दुधाबरोबरच राजहंस अॅक्वालाही उदंड प्रतिसाद लाभतोय. ना.बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून केंद्रशासनाकडून स्वच्छ दुधनिर्मिती प्रकल्पांतर्गत एकूण ६७ बल्क मिल्क कुलर्सची खरेदी करण्यात आली असून ५९ सहकारी दुध उत्पादक संस्थांच्या कार्यस्थळावर कुलर्स कार्यान्वयित करण्यात आले आहेत. यामाध्यमातून एकूण ९३ सहकारी दुध उत्पादक संस्थांचे दुध संकलित होते. बल्क कुलरद्वारे एकूण १ लाख ३० हजार लिटर्स दुध संकलित केले जाते. हे दुध संगमनेर दुध संघात आणून वेगवेगळ्या संस्थांचे दुध टँकरमधून वेगवेगळ्या कंपार्टमेंटमधून आणून प्रत्येक संस्थेची दुधाची प्रत वेगळी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

No comments:

Post a Comment