Friday 8 February 2013

न झालेली भेट ( मा.ना.बाळासाहेब थोरात )

मार्च महिन्यातली गोष्ट! एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने इस्राईलला जाण्यासाठी माझी तयारी सुरु होती. मला संगमनेरहून जाधव सरांचा फोन आला, की "दादांची तब्येत जास्त बिघडलीय, ते तुमची खूप आठवण काढत होते. संगमनेरला येऊन त्यांना भेटून गेलात, तर फार बरं होईल."
दादांच्या तब्येतीत चढ-उतार सुरु आहेत, हे मला ठाऊक होतं. काही महिन्यांपूर्वीच ते ट्रीटमेंट साठी मुंबईट आले असताना मी त्यांना जसलोकमध्ये भेटूनही आलो होतो. त्या आजारपणातही तब्येतीविषयी तक्रारीचा सूर न लावता नवीन पुस्तकांविषयी गप्पा मारल्या होत्या. मी कोणती नवी पुस्तकं प्रकाशित करतोय, त्याबद्दल विचारलं होतं.
यावेळी जाधवसरांचा फोन आल्यावर मी ताबडतोब संगमनेरला जाऊन दादांना भेटून यायचं ठरवलं. माझ्या हातात. इस्राएलला जाण्यापूर्वी फक्त एकच दिवस होतं. त्याच दिवशी संध्याकाळी पाच सव्वापाचच्या सुमारास मला इस्राएलला जाण्यासाठी पुण्याहून निघणं गरजेचं होतं. माझ्या हातातला वेळ पाहता, लगेचच मी स्टॅण्डवर गेलो, त्यावेळी ती गाडीच काही कारणानं रद्द झाल्याचं कळलं. पुढची गाडी तीन वाजता होती. आता माझ्यासमोर काहीच पर्याय नव्हता मी परतलो आणि इस्राएलला रवाना झालो. तिथं मला दुसऱ्याच दिवशी ई-मेलवरून दादांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. मी फर अस्वस्थ झालो. आदल्याच दिवशी त्यांच्या अन् माझ्या त्या न झालेल्या भेटीची हुरहूर माझ्या मनाला कायमची लागून राहिली.
आज दादांच्या आठवणींवरचा हा लेख लिहीत असताना मला प्रामुख्याने आठवतात ते दोन प्रसंग! पहिला अर्थातच या न झालेल्या भेटीचा आणि दुसरा प्रसंग म्हणजे त्यांच्या अन् माझ्या पहिल्या भेटीचा!
१९९४ ची गोष्ट आहे ही! भारताच्या हरितक्रांतीचे शिल्पकार डॉ.आण्णासाहेब शिंदे यांच्या चरित्राचं 'कृषिक्रांतीचे सेनानी' या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.श्री.शरद पवार यांच्या हस्ते चरित्राचं प्रकाशन होणार होतं. कृषिक्षेत्रातले तसंच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज या समारंभासाठी उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिरात रसिकंही इतकी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती की ती पाहता, हा कुठल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असावा, असं वाटतंच नव्हतं. कुठला राजकीय मेळावा किंवा जाहीर सभा असावी, इतकी गर्दी होती.
कार्यक्रम सुरु होत असताना मा. श्री.शरद पवार यांचं लक्ष श्रोत्यांमध्ये बसलेल्या भाऊसाहेबांकडे गेलं. तिसऱ्या-चौथ्या रांगेत एका बाजूला भाऊसाहेब बसले होते. त्यांना बघितल्यावर व्यासपीठावरूनच त्यांना व्यासपीठावर येण्यासाठी निरोप पाठवला. व्यासपीठावर बसलेल्या आम्हा साऱ्यांसह तिथे जमलेल्या साऱ्या श्रोत्यांचे लक्ष पवारसाहेब बोलले, त्या दिशेकडे वळलं. शुभ्र कपडे घातलेले भाऊसाहेब. भारदस्त व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर हास्य, चेहऱ्यावर हास्य असलं तरी त्यावरची जरब लपत नव्हती. भाऊसाहेब व्यासपीठावर येऊन बसले. भाऊसाहेबांना मी प्रथम बघितलं, ते त्यावेळी!
ज्यांच्या चरित्राचा प्रकाशन सोहळा होता, त्या अण्णाहेबांचे ते सख्खे मेव्हणे! महाराष्ट्रातल्या सामाजिक-राजकीय आणि विशेषत: सहकार क्षेत्रातल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वांमध्ये भाऊसाहेब अग्रणी होते. संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. संगमनेर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या ध्यासाने त्यांनी मोठं काम तिथं उभं केलं होतं. त्यांच्या कामाचा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा आदरयुक्त दबदबा सर्वांच्याच मनात होता. अन् या कार्यक्रमात ते मागच्या रांगेत बसले होते. पुढे बसण्याचा आग्रह त्यांनी धरला नव्हता, त्या पहिल्याच भेटीत या व्यक्तीमत्वाच्या माणसाचं सौम्य अंतरंग आणि नम्रपणा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. इतक्या मोठ्या कणखर व्यक्तिमत्वाच्या अंगी, इतकं मोठं कर्तुत्व असतानाही नावालाही ego नसावा, ही दुर्मिळ गोष्ट होती!
कार्यक्रम संपल्यानंतर भाऊसाहेबांशी औपचारिक परिचय झाला. त्यांनी माझी चौकशी केली, आमच्या इतर प्रकाशनांची माहिती करून घेतली. तो कार्यक्रम संपला पण भाऊसाहेबांशी माझा व्यक्तिश: आणि अमेय प्रकाशनाचा ऋणानुबंध मात्र कायमचा जोडला गेला.
त्यानंतर १९९७ च्या सुमारास भाऊसाहेबांच्या 'अमृतमंथन' या त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन आम्ही केलं. अमृतमंथन, संघर्षयात्रा, अमृतगाथा या पुस्तकांच्या निर्मितीच्या निमित्ताने भाऊसाहेबांची वरचेवर भेट होण्याचा योग आला. त्यांच्या घरी कधीही गेलं कि चटकन नजरेत भरणाऱ्या तीन गोष्टी होत्या. पहिली म्हणजे त्यांचं आतिथ्य! दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जनसंग्रह आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं अफाट वाचन आणि पुस्तकांचा संग्रह!
त्यांच्या घरी गेल्यानंतर अत्यंत आतिथ्याने स्वागत होत असे. विशेष म्हणजे आपण कोणा लोकनेत्याच्या घरी आलोय, असं वाटतच नसे. सदोदित त्यांच्या घरात, त्यांची भेट घेण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा राबता असायचा. प्रत्येकाशी ते बोलायचे. चौकशी करायचे. त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्याने मानसं जोडली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. त्याकाळात त्यांची झालेली घडण त्यांच्या वागण्याबोलण्यातून सहज लक्षात येत असे. समाजकारण करताना, समाजविकास घडवून आणताना 'माणूस' हाच केंद्रबिंदू असायला हवा, हि भावना त्यांनी स्वत:च्या वागण्यातून भोवतालच्या लोकांमध्ये रुजवली होती.
त्यांच्याकडे गेलं कि त्यांच्या टेबलवरची पुस्तकंही अशी चटकन नजरेत भरायची. अनेक विषयांवरच्या चिंतनात्मक, वैचारिक पुस्तकांचा अक्षरश: ढीगच त्यांच्या बाजूला असायचा आणि आलटून पालटून सर्व पुस्तकांचं त्यांचं वाचन सुरु असायचं. एकाच वेळेला अनेक पुस्तकांचं वाचन करीत असूनही त्यांना नेमक्या वेळेला नेमक्या पुस्तकातले संदर्भ भरभरा कसे आठवत, याचं मला फार आश्चर्य वाटायचं त्यांच्याकडे गेलं कि, नवनवीन पुस्तकांविषयी त्यांच्याशी चर्चा होई. आमची नवीन प्रकाशनं मी त्यांना पाठवली की आठवणीनं ती वाचून त्यावर ते निश्चितपणे त्यांची प्रतिक्रिया कळवत असत. आणि हि गोष्ट अगदी अखेरपर्यंत चालू होती.
'अमृतमंथन' हे त्यांचं आत्मचरित्र हे 'अमेय'च्या वाटचालीतलं एक खूप महत्वपूर्ण आणि मानाचं प्रकाशन आहे, असं मी मानतो. त्याचं एक कारण अर्थातच भाऊसाहेबांचं अनुभवसंपन्न आयुष्य आणि त्याविषयी अतिशय प्रांजळ आत्मकथन हे! भाऊसाहेबांसारख्या समाजधुरीण व्यक्तीनं स्वत:च्या आयुष्याबद्दल प्रांजळपणे लिहून सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक मॉडेल दिलं, असं मी मानतो. प्रत्यक्ष field वर काम करणाऱ्या हजारोंना या पुस्तकामुळे उर्मी मिळाली. या आत्मचरित्राने एक नवा वैचारिक प्रवाह सुरु केला.
त्याच वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट वैचारिक लेखानासाठीचा पुरस्कार 'अमृतमंथन'ला मिळाला त्याचं पुरस्कारवितरण समारंभही अविस्मरणीय होता. मसापच्या हॉलमध्ये तुडुंब गर्दी जमली होती. केवळ मुबई-पुण्यातूनच नाही तर संगमनेर परिसरातल्या अनेक लहानमोठ्या गावातून अनेक जण भाऊसाहेबांच्या आत्मचरित्राच्या या कौतुकसोहळ्यासाठी उपस्थित होते.
त्यादिवशी पुरस्कार स्वीकारताना केलेलं भाषण माझ्या कायमचं लक्षात राह्यलंय. तरुणपनातल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीतला त्यांचा सहभाग, तेव्हा झालेला कारावास, कारावासात त्यांना लाभलेला अनेक ज्येष्ठ नेत्यांचा सहवास, त्या बंद भिंतीमध्ये त्यांनी प्रयत्नपूर्वक जोपासलेला वाचनाचा छंद... त्यांच्यावरचा साम्यवादाचा प्रभाव. पुढे कालांतराने साम्यवादी चळवळीबद्दलचा त्यांचा भ्रमनिरास हा प्रवास सांगत सांगत सहकार क्षेत्रात काम करण्याच्या निर्णयापर्यंत आपण कसे आलो हे सांगितलं. त्यांच्या भाषणानं एक वेगळीच छाप श्रोत्यांवर त्यादिवशी उमटली.
या पुस्तकांच्या निर्मितीनंतरही त्यांच्या भेटी होतच होत्या. आता तर त्यांच्या साऱ्या परिवाराशी मी एक प्रकारे जोडला गेलो होतो. बाळासाहेबांच्याही भेटी व्हायला लागल्या. भाऊसाहेबांचा समर्थ वारसा लाभलेल्या या स्नेहशील आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या लोक्नेत्याशीही मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. २००७ साली नाशिकहून पुण्याला परतताना संगमनेरला भाऊसाहेबांना भेटावं म्हणून मी मुद्दाम थांबलो. त्यांच्या घरी गेलो, तर सगळीकडे 'दंडकारण्य' या नावही पत्रकं, ब्रोशर्स, पाट्या दिसत होत्या. कुतूहलाने मी त्यांना विचारलं, तर अतिशय उत्साहाने त्यांनी मला त्यांच्या या नवीन मोहिमेची माहिती दिली. वयाच्या ८०व्या वर्षी भाऊसाहेबांनी ही नवी जनचळवळ समाजात रुजवण्याचा संकल्प हाती घेतला होता. स्वत:ची तब्येत बरी नसतानाही या खऱ्याखुऱ्या लोक्नेत्याने पुन्हा एकदा लोकांची, लोकांसाठी असणारी ही चळवळ उभी करण्याचा ध्यास घेतला होता. संगमनेर आणि त्याच्या परिसरातल्या २८००० एकर पडीक जमिनीवर १ कोटी बीजारोपण करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. गावोगावातून, वाड्यावस्त्यांतून त्यांनी स्वयंसेवक तयार केले. हजारो स्री-पुरुष त्यात सहभागी झाले होते. अगदी शाळकरी मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत अनेकजण या कामात स्वेच्छेने कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता उतरले होते.
भाऊसाहेबांनी या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पाबाबत एक पुस्तक करावं. अशी कल्पना मी त्यांना बोलून दाखविली. त्यानीही मोठ्या उत्साहाने त्याला होकार दिला. सर्व ते सहकार्य करण्याचं मान्य केलं. यातून अरुणा अंतरकर यांनी लिहिलेल्या 'कथा आधुनिक दंडकारण्याची' हे पुस्तक तयार झालं. त्याचा English मध्ये अनुवादही झाला. भाऊसाहेबांच्या प्रेरणेतून, संकल्पनेतून, साकार झालेला हा प्रकल्प थेट युनाटेड नेशन्सपर्यंत जाऊन पोहोचला. युनाटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) ने आपल्या वेबसाईटवर जगभरातल्या अशा success stories मध्ये मानाचं स्थान भाऊसाहेबांच्या 'दंडकारण्याला' दिलं. संगमनेर आणि परिसरात जि लोकाभिमुख कार्याची जाणीव भाऊसाहेबांच्या नेतृत्वाने वर्षानुवर्षे रुजवली, त्याचंच गे फलित होतं, असं मला वाटतं.
भाऊसाहेबांचं नेतृत्व हे खऱ्या अर्थाने लोकांचं, लोकांसाठीचं नेतृत्व होतं. ते स्वत:ही ते मान्य करीत. समाजात जागरुकतेची संस्कृती रुजवणं, हेच माझं काम आहे. मी फळ काय मिळेल याचा विचार, चिंता न करता साऱ्यांना बरोबर घेत सतत पुढे काम करत राहणारा कार्यकर्ता आहे, असं ते वेळोवेळी सांगत. म्हणूनच त्यांना भेटल्यानंतर आपल्याला कामाची प्रेरणा मिळत असे. त्यांना भेटावसं वाटे, ते यासाठीच!
त्याही दिवशी इस्राएलला जाताना मी मनात विचार केला होता, चारच दिवसात आपण परत येतोय. आल्याबरोबर लगेच दादांकडे जाऊ. नवीन पुस्तक आणलं का, म्हणून ते विचारणार याची खात्री होती.
दादांची ती न झालेली भेट मला कायमचं अस्वस्थ करून गेली.
उल्हास लाटकर
अमेय प्रकाशन,


 

No comments:

Post a Comment